vaitarna reti
Team Khulasa

पालघर: रेती उत्खननापासून तसेच रेती वाहून नेणार्‍या बोटींपासून पश्‍चिम रेल्वेवरील पुलांना संभाव्य धोका असल्याचे लक्षात घेऊन पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांनी आपले विशेष अधिकार वापरून वैतरणा नदीवरील रेल्वे पूल क्रमांक ९२ व ९३ यांच्या दोन्ही बाजूस सहाशे मीटर अंतरावर शासकीय विभागाच्या बोटी व्यतिरिक्त इतर सर्व बोटींना पूर्व परवानगीशिवाय नौकानयन मार्ग वापरण्यास मनाई आदेश लागू केले आहेत.
महाड येथे सावित्री नदीवरील झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील महत्त्वाच्या पुलांच्या स्थितीबाबत आढावा घेण्यात आला असता रेती उपशामुळे तसेच रेतीच्या बोटींच्या वर्दळीमुळे वैतरणा पुलाला धोका संभवत असल्याचे पुढे आले आहे. पश्‍चिम रेल्वेच्या मुख्य ब्रिज अभियंता यांनी वैतरणा नदीवरील दोन्ही पुलांच्या कार्यक्षेत्रात व त्यांच्या पोहोच मार्गात रेती उत्खनन व नौकानयन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच या पुलांना संभाव्य धोका उद्भवल्यास त्याचे होणारे परिणाम पत्राद्वारे कळविले होते. वैतरणा रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर २०११ पासून पूल क्रमांक ९२ च्या क्षेत्रातील रोडचा वापर रेती वाहतूक ट्रकसाठी बंद करण्यात आला होता. त्याप्रमाणे ५ ऑगस्टपासून वैतरणा नदीसह जिल्ह्यातील इतर सर्व नद्यांवरील पुलांच्या सहाशे मीटर कार्यक्षेत्रात अहोरात्र पोलीस गस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वैतरणा पुलाची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय प्राधिकरणाचे अध्यक्षपदाचे विशेषाधिकारांचा वापर संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी कलम ३० व ३४ अन्वये निर्देश ६ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत. त्यानुसार ५ ऑक्टोबर २०१६ पर्यंतच्या कालावधीत पोलीस, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, नौदल, मत्स्यव्यवसाय, वन, कोस्ट गार्ड, उत्पादन शुल्क इत्यादी शासकीय विभाग वगळून इतर सर्व व्यक्तींना वैतरणा नदीवरील रेल्वे पूल ९२ व ९३ यांच्या दोन्ही बाजूस ६०० मीटर अंतरावर जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय नौकानयन मार्गाचा वापर करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.