img-20170104-wa0014

Team khulasa

मुंबई/पिंपरी : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी तळेगावजवळच्या उर्से टोलनाक्यावरच्या आयआरबी कर्मचारी आणि व्यवस्थापकांना चांगलेच सुनावले. पैसे घेऊनही मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वरील वाहतूक असुरक्षित आहे, आणखी किती जीव घेणार, असा जाब विचारताना सिंधुताईंचा उद्रेक झाला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर प्रवास करताना सिंधुताई सपकाळ यांच्या डोळ्यादेखतच भीषण अपघात होता होता टळला. त्या गाडीमध्ये लहान मुलांसह वीसच्या जवळपास महिलांचा समावेश होता. हा प्रसंग प्रत्यक्ष घडताना पाहून सिंधुताई उद्विग्न झाल्या आणि त्यांनी न राहवून टोलनाक्यावरच संताप व्यक्त केला.

उर्से टोलनाक्यावर थांबून ‘आणखी किती लोकांचे तुम्ही जीव घेणार?’ अशा शब्दात सिंधुताईंनी जाब विचारला. पुढील ८ दिवसात प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर हजारो नागरिकांना महामार्गावर उतरवून आंदोलन छेडण्याचाही इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे केंद्र सरकारचा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु असतानाच ही घटना घडली.

चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या विनोद सातव यांनी टोलनाक्यावर गर्दी पाहून चौकशी केली. त्यावेळी सिंधूताईंचा झालेला संताप त्यांनी पाहिला. त्यानंतर सातव यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला.