Team Khulasa

नालासोपारा: नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे तिकीट परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून तिथे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अक्षरश: तोंडावर रुमाल धरून तिकीट काढावी लागत असल्याचे चित्र दिसून येते. रेल्वे प्रशासनातील सफाई कर्मचारी साफसफाई करण्यात कसूर करत असल्याने रेल्वे प्रवाशांना व नागरिकांना दुर्गंधी चा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने तात्काळ या गोष्टीचा विचार करून पूर्वेतील रेल्वे तिकीट खिडकी परिसरात साचलेला कचरा साफ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे तिकीट घर परिसरात पावसाळ्यात पावसाचे पाणी साचते. या घाणेरड्या पाण्यातून मार्ग काढताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. या सर्व प्रकरणी नालासोपारा रेल्वे प्रवाशांन मध्ये नाराजीचे वातवरण निर्माण झाले आहे. नालासोपारा हे सर्व स्थानकांच्या तुलनेने जास्त महसूल देणारे स्थानक आहे. मात्र पाऊस गेला तरी पूर्वेकडील तिकीट घराच्या परिसरात कायम पावसाचे पाणी साचलेले असते. त्या पाण्यात कचरा असतो अशा चिखलयुक्त घाणेरड्या पाण्यातून प्रवाशांना मार्ग काढावा लागतो. आणि यामुळे साथीचे आजार पसरण्यास मदत होते.
रेल्वेच्या प्रशासनाकडून स्वच्छतेच्या प्रबोधनपर उद्धोषणा दिल्या जातात. मात्र नालासोपारा पूर्वेकडील तिकीट घर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे ते रेल्वे प्रशासनाला दिसत नाही का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वसई-विरार शहर महापालिकेचे माजी नगरसेवक साज्कुमार चोरघे यांनी एका निवेदनाद्वारे पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना नालासोपारा पूर्वेतील तिकीट घर परिसरात होत असलेल्या काचऱ्याच्या निवारणाबाबत मागणी केली आहे.