Team Khulasa

विरार: मुंबई नागरी वाहतूक योजना -३ या योजनेस गतवर्षी केंद्र शासनाने मंजुरी दिली असल्यामुळे विरार-डहाणू रेल्वे चौपदिकरण करण्याबाबतचा अतारांकित प्रश्न बहुजन विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर व विलास तरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उपस्थित केलेला होता.
त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पश्चिम रेल्वेच्या विरार- डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदिकरणाच्या पूर्णत्वाचा अंदाजित खर्च जवळपास ३५७८ कोटी रुपये इतका असल्याचे सांगितले आहे. या खर्चा पैकी जागतिक बँकेकडून २६८४ कोटी कर्ज मिळणे अपेक्षित असले तरी जागतिक बँकेशी वाटाघाटी केल्यानंतरच कर्जाची अंतिम रक्कम निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित खर्चाची रक्कम रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र प्रशासन ५०:५० या प्रमाणात सोसणार असून शासनाच्या हिस्स्याचा ५० टक्के आर्थिक सहभाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सोसण्याबाबत एमएमआरडीए ला शासनामार्फत निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हा प्रकल्प पाच वर्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. रेल्वेमार्गाचे चौपदिकरण हा पालघर जिल्हातील जनतेचा अत्यंत महत्वाच्या आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे बहुजन विकास आघाडी चे लोकप्रतिनिधी याचा सातत्याने पाठपुरवठा करून हा प्रकल्प शीघ्रतेने पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.