Team Khulasa

भाईंदर : सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेते पदासाठी झुलवत ठेवलेल्या शिवसेनेच्या पक्ष घोषित विरोधी पक्ष नेत्याने काही नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिका-यांसह महापौर दालनात विरोधी पक्ष नेत्याचे कार्यालय थाटले.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत ६१ जागा जिंकून भाजप सत्ताधारी पक्ष झाला, तर २२ जागा पदरात पाडून शिवसेना विरोधी पक्ष झाला, नियमानुसार सत्ताधारी पक्षानंतरचा दुसरा मोठा पक्ष असणा-या पक्षाला विरोधीपक्ष नेते पद मिळते, त्यानुसार शिवसेनेने राजू भोईर यांना विरोधी पक्ष नेता जाहीर करावे अशी शिफारस महापौरांकडे केली. महापौरांनी त्याला मान्यता देऊन जाहीर करणे आवश्यक असते. एका नगरसेवकाने आक्षेप घेतल्यामुळे महापौरांनी शासनाकडे अभिप्राय मागितला आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेता अधिकृतपणे जाहीर झालेला नाही.
दहा वर्षे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक असलेले राजू भोईर यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी, दोन भाऊ, पत्नी आणि वहिनी यांना उमेदवारी मिळवून देत, शिवसेनेत प्रवेश केला होता. आणि निकाल जाहीर होताच काही दिवसांतच भाजपच्या कार्यक्रमात मुखमंत्र्यांची भेट घेऊन सेनेला बुचकळ्यात टाकले होते.
दहा वर्षात सभागृहात एकही शब्द न बोललेल्या राजू भोईर यांची विरोधी पक्षनेते पदी पक्षातर्फे नियुक्ती करण्यात आल्यामुळे सेनेत नाराजी पसरली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या राजू भोईर आणि त्यांच्या समर्थकांनी महापौर दालनात जाऊन आपले कार्यालय थाटून स्वत:चे हसू करून तर घेतलेच, त्याचबरोबर महापौर पदाच्या प्रतिष्ठेची अवहेलना केली, अशी प्रतिक्रिया उपस्थित कर्मचा-यांनी व्यक्त केली.
महापौर दालनातील गोंधळ समजताच महापौर आणि आयुक्त उपस्थित नसल्यामुळे आपण तेथे गेलो. नगरसेवक राजू भोईर यांनी आपणास विरोधी पक्षनेतेपदाचे नाव जाहीर करा, तो प्रशासनाचा अधिकार आहे, असे सांगितले. महापौरांच्या खुर्चीच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर ते तसेच काही सन्माननीय सदस्य बसले, आपण याची माहिती आयुक्त तसेच महापौरांना दिली आहे.
-डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त, महापालिका

माझ्या पक्षाने माझी विरोधी पक्ष नेतापदी नियुक्ती केली आहे. मला लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. महापालिकेत माझ्यासाठी दालन नसल्यामुळे नाइलाजास्तव मी आजपासून रोज सकाळी महापौर दालनात बसून विरोधी पक्षनेत्याचे काम करणार आहे.
-राजू भोईर, शिवसेना घोषित विरोधी पक्षनेते