Team Khulasa

भाईंदर : मीरारोड येथील कृष्णस्थळ परिसरातील मुन्शी कंपाऊंड जवळ तळ अधिक दोन मजली इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम सुरू असल्याची तक्रार या भागातील सामाजिक कार्यकर्ते मुकेश मेहता यांनी सप्टेंबर महिन्यात पालिकेला केली होती. पालिकेचे बिट निरीक्षक गजानन भोसले यांनी पाहणी करून ७ सप्टेंबरला अहवाल सादर केला होता व पालिकेने त्यांना नोटीस पाठवून परवानगी बाबतचे सर्व कागदपत्रे मागविली होती परंतु शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत दोन मजल्यावर अजून एक मजला तयार केला. मात्र आज तीन महिन्यांनंतर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी ११ वजता या अनधिकृत इमारतीला जमीनदोस्त केले.
तक्रारदार मुकेश मेहता यांनी लोकशाही दिनाला तक्रार केली परंतु आयुक्त दालनात उपस्थित असतानाही कर निर्धारक अधिकारी स्वाती देशपांडे यांनी लोकशाही दिनाचे संचालन केले त्यात प्रभाग अधिकाऱ्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. या अनधिकृत बांधकामास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नगरसेवकाचा किंवा पदाधिकार्याचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी देखील तक्रारदार मुकेश मेहता यांनी केली आहे.
कमलेश भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर जागा आपल्या वडिलांच्या नावावर असल्याचे सांगितले. तसेच मुन्शी कंपाऊंड भागात रस्त्या रुंदीकरणासाठी जागा गेल्यामुळे अशाप्रकारे अनेक गाळाधारकांनी बांधकाम केले आहे.