Team Khulas

मुंबई: मेट्रोसह विविध प्रकल्पांमुळे सध्या मुंबईभर ट्रॅफिक जॅमची समस्या आहे. त्यामुळे वाहतूक प्रशासनाने दक्षिण मुंबईत वाहतुकीचं काटेकोर नियोजन करण्याचं ठरवलं आहे.

दक्षिण मुंबईत अवजड वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेतच, शिवाय खासगी बसगाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत मुंबईत प्रवेश करण्यास आणि मुंबईतून बाहेर जाण्यास खासगी प्रवासी बसेसना परवानगी नसेल. अवजड वाहनांवर हे निर्बंध आधीच लागू आहेत.

नव्या नियमांमुळे मुंबई सेंट्रल आणि परिसरातून खासगी ट्रॅव्हल्सने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे. दरम्यान, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या दूध टँकर, भाजीपाला, पाणी, पेट्रोल-डिझेल, रुग्णवाहिका यासारख्या वाहनांना वगळण्यात आलं आहे.

दक्षिण मुंबईत पार्किंगचा प्रश्न पूर्वीपासूनच आहे, पण यापुढेही गाड्या पार्क करताना काळजी घ्यावी लागेल. स्वत:च्या आणि पे अँड पार्कच्या जागेतच खासगी बस आणि अवजड वाहने पार्क करावे लागतील. याशिवाय खासगी प्रवासी वाहतूक आणि अवजड वाहनांना दक्षिण मुंबईत दिवसाही बंदी आहेच. सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत हे निर्बंध आहेत.