Team Khulasa

भाईंदर : मीरा रोड मध्ये हाटकेश भागात जन आधार या सामाजिक संस्थेने सुरू केलेल्या विनामूल्य शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन महापौरांच्या हस्ते करण्यात आले. मीरा रोडच्या हाटकेश भागातील गौरव संकल्प फेस- २ मधील साई वाटिका सभागृहात जन आधार या सामाजिक संस्थेने दिगवंत समाज सेविका मंगला खेडेकर यांच्या स्मरणार्थ महिलांसाठी विनामूल्य शिवणकाम प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.

महिलांना स्वबळावर काहीतरी करता यावे यासाठी या संस्थेने लहानसा प्रयत्न केला आहे. ज्या महिलांकडे शिक्षण नाही व आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी या संस्थेने हातभार लावला आहे. समाजसेवक निलेश सोनी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ह्या केंद्रात आठवड्यातून तीन दिवस एक तासाचे एक सत्र अशा दोन सत्रात तज्ञ शिक्षक पवित्री पांडये महिलांना प्रशिक्षण देणार आहेत.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर महिलांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना शिवण यंत्र देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे अध्यक्ष नितीन नाईक यांनी सांगितले. या केंद्राचे उदघाटन महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. महापौरांनी संस्थेने यापूर्वी केलेल्या समाजभिमुख कार्याचे कौतुक केले.

या प्रसंगी समाजसेवक निलेश सोनी, नगरसेविका अनिता मुखर्जी, नीला सोन्स, रुपाली शिंदे, तसेच समाजसेविका सुधा गोसावी, भक्ती गोविंद उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यात ऍड. अनिता नाईक, कृष्णा मौर्य, निमिषा राठोड यांचे सहकार्य लाभले होते. महिलांनसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची हि एक संधीच मिळाली असल्याचे म्हणता येईल.