Team Khulasa

विरार: पोलीस अत्याचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या झा बंधूप्रकरणी राज्य गुप्तचर विभागाने (सीआयडी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना सोमवारी मध्यरात्री अटक केली. मंगळवारी त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शेख यांच्यावर झा बंधूंना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरारी होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुनाफ बलोच अद्याप फरारी आहे.
विरारमध्ये राहणाऱ्या विकास झा (२२) या तरुणाने ९ डिसेंबर २०१७ रोजी पोलिसांच्या जाचाला कंटाळून वसई उपअधीक्षक कार्यालयात स्वत:ला पेटवून आत्महत्या केली होती. भावाला न्याय मिळाला नाही म्हणून त्याचा मोठा भाऊ अमित झा (३०) यानेही १७ फेब्रुवारी रोजी विषप्राशन करून आत्महत्या केली होती.

याप्रकरणी विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून युनूस शेख फरारी होते.
या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांच्याकडे देण्यात आला होता. नंतर हा तपास राज्य गुप्तचर विभागाकडे सोपवण्यात आला होता. युनूस शेख यांच्या अटकेसाठी राज्य गुप्तचर विभागाने विशेष पथक तयार केले होते. वसईच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे विशेष पथकही सोबतीला होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून शेख पोलिसांना गुंगारा देत होते. सोमवारी रात्री युनूस शेख हे डोंगरी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला होता. मध्यरात्री एकच्या सुमारास शेख फोच्र्युनर या आलिशान गाडीतून डोंगरी येथे आले असता पोलिसांनी त्यांना अटक केली. मंगळवारी दुपारी मोठय़ा पोलीस बंदोबस्तात शेख यांना वसई सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली.