Team khulasa

मुंबईः बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या दुर्मिळ आजाराबाबत ‘इंडस्ट्री’त आणि चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, इरफानच्या पत्नीनं – सुतापाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यातून तिनं आपण एका मोठ्या लढाईसाठी सज्ज होत असल्याचं सूचित केलंय आणि इरफानसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानलेत. या पोस्टने त्याचे चाहते अधिकच अस्वस्थ झालेत.
इरफान खानने ५ मार्चला केलेल्या ट्विटने सगळ्यांनाच धक्का बसला होता. आपल्याला एक दुर्मिळ आजार झाल्याची माहिती देत त्यानं चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर, बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांनीही त्याला ‘गेट वेल सून’चे मेसेज पाठवल्यानं चाहत्यांच्या मनातील शंका, संभ्रम आणि काळजीत भर पडली. काहीही अंदाज वर्तवू नका, ८-१० दिवसांत रिपोर्ट येतील तेव्हा मी स्वतः तुम्हाला कल्पना देईन, असं इरफाननं ट्विटमध्ये म्हटलंय. पण तरी चाहते तर्कवितर्क लढवत आहेत.
याच काळात इरफानच्या पत्नीची पोस्ट फेसबुकवर पडली. त्यातून सगळ्या शंकाकुशंकांना पूर्णविराम मिळेल असं वाटलं पण, उलट तिनेही आजाराबाबत कुठलाच खुलासा केला नाही.
सुतापा म्हणाली, ‘माझा सर्वात जवळचा मित्र आणि जीवनसाथी लढवय्या आहे. जीवनातील प्रत्येक संकटाशी तो समर्थपणे लढतोय. त्याच्यासाठी आपण सगळेच प्रार्थना करताय, त्यामुळे मी तुमची कर्जदार आहे. सध्या मी रणांगणात रणनीती आखतेय. ही लढाई मला जिंकायचीच आहे. मी खूप आशावादी आहे. तुम्हाला सगळ्यांनाच इरफानच्या आजाराबाबत जाणून घ्यायचंय. पण चाचण्यांसाठी थोडा वेळ द्या आणि प्रार्थना करत राहा. आम्ही लवकरच ही लढाई जिंकून तुमच्यासोबत विजयोत्सव साजरा करू.’
या पोस्टमधून इरफान आणि त्याचं कुटुंब मोठ्या आव्हानाशी झुंजत असल्याचं स्पष्ट जाणवतंय. मात्र, त्यांच्या आयुष्यातील हे वादळ काय आहे, हे काही दिवसांनंतरच कळू शकेल.