Team Khulas

वसई: वसईतील भोईदापाडा परिसरात वसई विरार महापालिका आणि वनविभागाने २५ दिवसापूर्वी तोडक कारवाई केली होती, या कारवाईला हिंसक वळण लागले होते, तरी सुद्धा पालिकेने ५०० हून अधिक घरे जमीनदोस्त केली होती. आज २५ दिवस उलटून गेले तरी या लोकांना कुणी विचारायला सुद्धा आहे नाही, शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. त्यांना प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, उघड्यावर दिवस घालवावे लागत आहेत. डोक्यावरचे छतच हिरावून घेतल्याने येथील लोक खूप हलकीत दिवस काढत आहेत.
हे सर्व कोणत्याही भूकंपात उधवस्त झाले नसून, वसई विरार महापालिकेने केलेल्या तोडक कारवाईचे परिणाम आहेत. अतिशय अमानुषपणे लोकांना जबरदस्ती घरा घरातून काढून त्यांची घरे तोडल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. इतकेच नाही तर तोडक कारवाईच्या अगोदर कोणत्याही नोटीस या लोकांना देण्यात आल्या नाहीत. मागील अनेक वर्षापासून येथे हे लोक इथे राहत होते. पण अचानक पालिकेला आणि वन विभागाला जाग आली आणि मोठ्या कष्टाने घेतलेली गरिबांची घरे तोडण्यात आली.

आज या परिसरात मोठी भयानक परिस्थिती आहे. लोकांची घर तुटल्याने आणि घर खाली करण्याची कोणतीही संधी न दिल्याने, त्यांचा सारा संसार या घराखाली गाडला गेला आहे. त्यामुळे यांना खायला अन्न नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालये नाही, रात्री झोपायला अंथरून देखील यांना नाही, महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर बाजूलाच जंगल असल्याने जनावरांची सतत भीती या लोकांत आहे. शेकडो परीवारार उघड्यावर आपला संसार थाटून सरकारकडे मदतीची आस लावून बसले आहेत.
सदराच्या जागी झालेले अनधिकृत बांधकाम हे वनविभागाच्या जमिनीत झाले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. पण येथे राहणाऱ्या लोकांकडे ही जागा खाजगी असल्याचे पुरावे आहेत, तसेच वनविभागाचे जागा दाखवणारे पोइंट या जागेपासून लांब आहेत, या लोकांकडे घरपट्टी, वीजबिल, रेशनकार्ड आहेत. इतक्या वर्षापासून राहत असताना कुणीही यांना खटकले नाही. मग अचानक ही तोडक कारवाई कशी झाली असा सवाल हि लोक विचारात आहेत.
ज्या विकासकाने यांना घरे दिली, ते सर्व पसार झाले आहेत, यामुळे आता करायचे तरी काय? हा प्रश्न या लोकांत निर्माण झाला आहे. यांच्या मदतीला कोणीच अधिकारी, पुढारी, वा प्रशासन आले नाहीत, मोठ्या हालाकीत हि लोकं जीवन जगत आहेत.
या संदर्भात महापालिका व वनविभाग यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. पण येथील गोर गरिबांचे काय? या बाबत काहीही बोलण्यास कोणताही अधिकारी तयार नाही .
वसई तालुक्यात अनधिकृत बांधकामाचा स्तोम माजला असताना केवळ आमच्याच घरावर कारवाई का? इतके दिवस पालिका प्रशासन झोपले होते का? प्रशासकीय अधिकारी आणि वनविभागाच्या आशीर्वादाशिवाय ही अनधिकृत बांधकाने उभी राहिलीच कशी? अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? केवळ गरीब म्हणून आमचा बळी का घेतला जातो? असे अनेक आरोप येथील नागरिकांनी प्रशासनावर केले आहेत.